महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी । पिंपरी । पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व दवाखाने, रुग्णालयांमध्ये क्षयरोग, कुष्ठरोग, कुटुंब कल्याण, अंधत्त्व निवारण आदी राष्ट्रीय कार्यक्रम वगळून उर्वरित इतर रुग्णांपैकी गरीब, निराधार अशा जास्तीत जास्त 40 टक्के रुग्णांना केसपेपर फी वगळता अन्य संपूर्ण वैद्यकीय सेवा मोफत देण्यात येते. त्याच प्रमाणे दिव्यांग व्यक्तिंनाही याच सुविधा मिळाव्यात, यासाठी पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी महापालिका वैद्यकीय अधिकार्यांना वेळोवेळी निवेदने देऊन ही मागणी केली होती. आ. बनसोडे यांच्या याच मागणीची तात्काळ दखल घेत महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकार्यांनी अंध, अस्थिव्यंग, मुकबधिर, मतिमंद, आश्रम शाळेतील विद्यार्थी, भुकंपग्रस्त, गरीब निराधार रुग्णांना वैद्यकिय सेवा देताना ती मोफत देण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकार्यांनी तशा प्रकारच्या सूचना वैद्यकीय विभागीय सर्व अधिकार्यांना पत्राद्वारे दिल्या आहेत. दिव्यांगानाही मोफत वैद्यकीय सुविधा मिळणार असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सर्व दिव्यांगांनी आमदार आण्णा बनसोडे यांचे आभार मानले आहेत.