महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – चिपी विमानतळाचे उद्घाटन कधी होणार याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र शुभारंभाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. असे असले तरी येत्या आठ ते दहा दिवसांत मुंबईहून विमान सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर उतरेल आणि सिंधुदुर्गवरून मुंबईला जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी होणार असे निमंत्रणपत्रक व्हॉट्सऍपवर फिरू लागल्याने संभ्रम निर्माण झाला होता. विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी चिपी विमानतळ प्रकल्पाची पाहणी करून उदय सामंत यांनी एक बैठक घेतली. याविषयीची माहिती पत्रकारांना देताना उदय सामंत म्हणाले, तांत्रिक बाबी पूर्ण करूनच विमानसेवा सुरू होईल. विमानतळाकडे येणारे रस्ते, परिसर सुशोभीकरण, केंद्राची सिक्युरिटी नसल्याने पोलीस अधिकारी किती लागतील? कॉन्स्टेबल किती लागतील? वेपनवाले पोलीस किती लागतील? सुरक्षा बोर्डाचे सुरक्षरक्षक किती पाहिजेत? याच्यावर आजच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विमान उड्डाण आणि लँडिंगसाठी जी यंत्रणा लागेल ती सर्व यंत्रणा सज्ज आहे. केंद्राकडून आवश्यक ती परवानगी मिळाली की विमानसेवा सुरू होईल.
याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत म्हणाले, गेले चार दिवस दिल्ली येथील डीजीसीए, एअरपोर्ट ऑथोरिटी, अलायन्स एअरलाइन्स, टेक्निकल विभाग आदी पथकांनी या विमानतळाची बारकाईने तपासणी केली. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार विकासक असलेली आयआरबी कंपनी आपला एटीआर सादर करेल, त्यानंतर विमानसेवा देणारी एअर अलायन्स कंपनीचे पथक पुन्हा विमानतळाची पाहणी करेल, त्याला 8 ते 10 दिवस जातील. केंद्राच्या उड्डाण योजनेत हा प्रकल्प असल्याने केवळ 2 हजार 500 रुपयांत प्रवाशांना मुंबईचा प्रवास करता येईल. केंद्रीय हवाई मंत्री हरदीपसिंग पुरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपर्प सुरू आहे. केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत आहे. पायाभूत सुविधांमध्ये लाईट, रस्ता, पाणी, टेलिफोन आदींची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.