वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ ठरणार मदतनीस – गृहमंत्री अनिल देशमुख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – नागपूर – वाहतूक पोलिसांना त्यांचे काम चोखपणे बजावता यावे यासाठी बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. नागपूरप्रमाणे इतर शहरांनाही वाहतूक सुव्यवस्थेसाठी लवकरच बॉडी वॉर्न कॅमेरे देण्यात येतील, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

पोलीस जिमखाना येथे वाहतूक शाखेतील पोलिसांना या कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सुनील फुलारी, डॉ. दिलीप झळके, पोलीस उपायुक्त (वाहतूक) सर्वश्री सारंग आवाड, विनिता साहू, लोहित मतानी, गजानन राजमाने, विवेक मासाळ, अक्षय शिंदे, निलोत्पल आदी यावेळी उपस्थित होते.

वाहतूक शाखेच्या पोलिसांना दोनशे बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी श्री. देशमुख म्हणाले की, बऱ्याचदा वाहनधारक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करतात. अशा वेळी पोलिसांनी थांबविल्यास वाद निर्माण होतो. काही वेळेस हल्लेही होतात. अशा प्रसंगी शहरात पोलिसींग करणाऱ्या पोलिसांना बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची मदत होणार आहे. या कॅमेरांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा आहे. वाहतूक शाखेचे पोलीस कर्तव्यावर असताना आपल्या गणवेशावर बॉडी वॉर्न कॅमेरा लावतील. रेकॉडिंग सिस्टिम असल्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता कडक कार्यवाही करण्यात येईल.

पोलीस विभागामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. शहरात सद्यस्थितीत 3,688 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आगामी काळात वाहतूक पोलिसांना मदत करणारे स्वयंसेवक (ट्रँफिक वार्डन) ही संकल्पना शहरात राबविण्यात येइल. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी घोडयावरुन गस्त घालणारे पोलीसांचे युनिट सुरु करण्यात येईल. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी नागरिकांनी दक्ष राहावे. कोविड लसीकरण्याच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेलाच माहिती दिली जाईल, याची दक्षता घ्यावी, असेही ते यावेळी म्हणाले.

बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे सुलभ जाईल. पोलीस विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे . बॉडी वॉर्न कॅमेरा म्हणजे वाहतूक पोलिसांच्या कारवाई दरम्यान सर्व प्रसंगांना रेकॉडिंग करण्यासाठी गणवेशावर लावलेला कॅमेरा असल्याचे अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले. संचार कम्युनिकेशन सिस्टीमचे हर्ष लाहोटी यांनी यावेळी सादरीकरण करुन बॉडी वॉर्न कॅमेऱ्याचे महत्त्व समजून सांगितले. निलोप्पल यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत सादरीकरणाद्वारे दाखविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *