महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने जोरदार कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर २१ धावा करणाऱ्या वॉर्नर – हॅरिस जोडीने चौथ्या दिवशी सलामीची भागिदारी ८९ धावांपर्यंत नेली. पण, ही जमलेली जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने ३८ धावा करणाऱ्या हॅरिसला बाद केले. त्यानंतर लगेच वॉशिंग्टन सुंदर यानेही ४८ धावा खेळणाऱ्या वॉर्नरला बाद करत दोन्ही सेट झालेले फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडले.
भारताची डोकेदुखी ठरु पाहणारी ही जोडी माघारी धाडल्यानंतर सिराजने दमदार फॉर्ममध्ये असलेल्या मार्नस लाबुशेनला २५ धावांवर बाद करत कांगारुंना तिसरा धक्का दिला. त्यानंतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सिराजने मॅथ्यू वेडला बाद करत कांगारुंना बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर स्टिव्ह स्मिथने गडगडणारा ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. उपहारासाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था बिनबाद ८९ वरुन ४ बाद १४९ अशी झाली.
मात्र, उपहारानंतर स्मिथने कॅमेरुन ग्रीनच्या साथीने डाव सावरत आघाडी वाढवण्यास सुरुवात केली. त्याला मोहम्मद सिराजने झेल सोडून जीवनदान दिले. त्याचा फायदा उचलत त्याने ६७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, भारताला विकेटची नितांत गरज असताना पुन्हा एकदा सिराज संघाच्या मदतीला धावून आला आणि त्याने स्मिथला ५५ धावांवर बाद केले. सिराजनेच स्मिथला जीवनदान दिले होते पण, त्याची विकेट घेऊन उशिरा का होईना त्याने आपली चूक सुधारली.
स्मिथ बाद झाल्यानंतर कांगरुंच्या फलंदाजीला गळती लागली. शार्दुल ठाकूरने ३७ धावा करणाऱ्या ग्रीला आणि त्यानंतर कर्णधार टीम पेनला ( २ ) पाठोपाठ बाद करत कांगारुंचे अव्वल फलंदाज संपवले. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या ६६.१ षटकात ७ बाद २४३ धावा झाल्या होत्या. मात्र चहापानानंतर सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबला.