महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – सिंधुदुर्ग : पर्यटन जिल्हा म्हणून स्थान मिळवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळाचे स्वप्न अखेर पूर्णत्वास येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही ना काही कारणाने रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा येत्या २३ जानेवारी रोजी समारंभपूर्वक होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतच भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा सोहळा लक्षवेधी ठरणार आहे.
चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी होईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, त्यात बदल करून हा सोहळा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर कोणते वाक्बाण सोडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.