महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ जानेवारी – करोना लसीकरणानंतर अंगदुखी, डोकेदुखी, ताप असे सौम्य दुष्परिणाम दिसत असले तरी ते धोकादायक नाहीत. त्यामुळे घाबरून न जाता लस घेण्यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, राज्यात सुमारे २,५०० जणांना सौम्य दुष्परिणाम आढळले असून यातील एकालाही तीव्र परिणाम जाणवल्याची नोंद नाही.
लस घेतल्यानंतर सर्वसाधारणपणे शरीरात काही बदल होतात. त्यामुळे लस दिलेल्या ठिकाणी सूज येणे, वेदना होणे, सौम्य ताप येणे असे दुष्परिणाम आढळून येतात; परंतु यामुळे विनाकारण भीती निर्माण केली जात असून, लशीच्या सुरक्षिततेबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळेही आरोग्य कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे मत मुंबई पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले.
* केंद्र सरकारकडून राज्याला कोव्हिशिल्ड लशीच्या आणखी आठ लाख ३९ हजार कुप्यांचा (डोस) पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना लशीची दुसरी मात्रा देणे शक्य होणार आहे.
* लसीकरण सुरू करण्यासाठी १२ जानेवारीला केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोव्हिशिल्डच्या नऊ लाख ६३ हजार, तर कोव्हॅक्सिन लशीच्या २० हजार कुप्या पुरवल्या. त्यानंतर राज्यभर लशींचा पुरवठा करून शनिवारी १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली.
* पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पहिल्या मात्रेनंतर २८ दिवसांनी दुसऱ्या मात्रा देण्यासाठी तब्बल १८ लाख कुप्यांची गरज होती. मात्र केंद्राला केलेला पुरवठा पाहता दुसरी मात्रा देण्यास पुरेसा साठा उपलब्ध होणार का, याची चिंता होती. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या ५११ वरून २८५ करण्यात आली होती.
* गुरुवारी दुपारी कोव्हिशिल्डच्या आठ लाख ३९ हजार कुप्यांचा साठा राज्याला प्राप्त झाला असून पुणे, मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि नाशिक विभागांना त्याचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित विभागातील जिल्ह्य़ांनाही लवकरच लशींच्या कुप्या पुरवल्या जातील, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
तीव्र दुष्परिणाम नाही..
लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखी, थकवा असे सौम्य दुष्परिणाम सुमारे २५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना घरी गेल्यानंतर जाणवले. जळगावमध्ये चार जणांना देखरेखीसाठी रुग्णालयात ठेवले होते. आता त्यांना घरी सोडले आहे. पुणे आणि अकोला येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही दुष्परिणाम आढळल्याने रुग्णालयात दाखल केले. त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. राज्यात जवळपास दहा जणांना रुग्णालयात दाखल केले होते; परंतु कोणालाही तीव्र दुष्परिणाम जाणवेले नाहीत, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.