महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २५ जानेवारी – ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी हक्काची हुकमी साद घालत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाच्या राजकारणावर हुकमत निर्माण केली. शिवतीर्थावरील लाखोंच्या गर्दीच्या विराट सभेतील शिवसेनाप्रमुखांची ‘ती’ पोझ मूर्तिकार शशिकांत वडके यांनी टिपली आणि तब्बल 9 फूट उंचीचा भव्य पुतळा उभा राहिला.
मुंबईत आलेले पर्यटक आणि मुंबईकरांची पावले आज आपसूक वळली ती दक्षिण मुंबईच्या दिशेने. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उभारलेला भव्य पूर्णाकृती पुतळा पाहण्यासाठी रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटाजवळ आज एकच गर्दी झाली होती. कुणी फोटो काढत होता, कुणी सेल्फी घेत होता तर कुणी आपल्या लाडक्या साहेबांसमोर नतमस्तक होत होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राज्यातील सर्वपक्षीय महनीय नेत्यांच्या उपस्थितीत शनिवारी या पुतळय़ाचे शानदार अनावरण झाले. हा पुतळा खरोखरच अलौकिक, अद्भुत आणि अचंबित करणारा आहे. जणू साक्षात बाळासाहेबच! म्हणूनच हा पुतळा पाहण्यासाठी आणि त्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मुंबईकरांनी आज गर्दी केली होती.