तीन वर्षांत मुंबईचे रुपडे पालटणार! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०। मुंबई । मुंबई वाढते आहे, पसरते आहे. मात्र या वाढणाऱया मुंबईत सामावून घेण्यासाठी आम्ही वेगाने काम करत असून येत्या तीन वर्षांत मुंबईचे रुपडे निश्चितच पालटणार आहे. कारण बेस्ट बसची संख्या 10 हजारांवर जाईल, मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोडचे काम सुरू आहे. अधिक वेगाने काम करताना आम्ही मुंबईकरांच्या सेवेस उतरू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

बंगळुरू येथून गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झालेल्या मेट्रो ट्रेनच्या डब्याचे अनावरण आज सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चारकोप डेपोत करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ब्रॅण्डिंग मॅन्युअल, ट्रव्हल कार्ड, ऑपरेशन कंट्रोल सेंट्रल, ग्रहण उपकेंद्र, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्घाटनदेखील या वेळी करण्यात आले. या वेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना परवडणाऱया घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येणार आहे. लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होणार आहे. आज मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. कुठल्याही विकासकामांना थांबवले नाही, तर पूर्वीपेक्षा अधिक गती देताना जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचे काम सरकार करीत असल्याने हे लोकाभिमुख सरकार असल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *