महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० जानेवारी – देशांतर्गत क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस सर्वात धक्कादायक ठरला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यंदा प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा असणारी रणजी करंडक स्पर्धा रद्द केली आहे. ८७ वर्षांत पहिल्यांदाच रणजी क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. (No Ranji trophy this year)
या सत्रात सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेनंतर विजय हजारे(vijay hajare) करंडक स्पर्धा आयोजित करण्याचे बीसीसीआयचे(BCCI) निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय फलंदाज व देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध खेळाडू वसीम जाफर(Wasim Jafar) याने कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर विजय हजारे, दुलीप करंडक आणि देवधर करंडक स्पर्धा रद्द करून त्या जागी रणजी स्पर्धा खेळवण्याचे बीसीसीआयला सुचवले होते. मात्र, बीसीसीआयने या सत्रात रणजी ऐवजी विजय हजारे करंडक स्पर्धा आणि इतर स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे.
आता या सत्रात बीसीसीआय विजय हजारे करंडकासोबत वरिष्ठ महिला एकदिवसीय स्पर्धा आणि १९ वर्षाखालील विनू माकंड एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार आहे. सोबत फेब्रुवारीमध्ये देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळवण्यात येणार आहेत. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. कोरोनानंतर प्रथमच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार असल्याने याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.