महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३०।पुणे । महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार आक्रमक झाल्यामुळे कर्नाटकी नेत्यांकडून गरळ ओकण्यात येत आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेकडूनही त्याच तोडीचे प्रत्युत्तर देण्यात येत असून पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसवर बेळगाव, कारवार, निपाणी संयुक्त महाराष्ट्र होणारच, असे पोस्टर लावले. त्यामुळे मराठीद्वेष्ट्यांचा तीळपापड होत आहे.
महाराष्ट्र?कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन केंद्र सरकारकडे सीमाप्रश्नी आक्रमकपणे भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कर्नाटकाच्या पायाखालची वाळू सरकली असून कर्नाटकी नेत्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे यांच्या प्रतिमेचेही दहन करण्यात आले. पण, या सर्वांना महाराष्ट्रातून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दावणगेरी?पुणे या कर्नाटक परिवहनच्या बसवर बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र होणारच, असे पोस्टर लावले. त्यामुळे मराठीद्वेष्ट्यांचा तीळपापड होत आहे.