महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१। चेन्नई । भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. सीरिजच्या पहिल्या दोन टेस्ट चेन्नईमध्ये (M.A.Chidambaram Stadium) खेळवण्यात येणार आहेत, तर उरलेल्या दोन टेस्ट अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) होतील. वर्षभरानंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन होत आहे. सोबतच आता स्टेडियममध्ये प्रेक्षकही दिसू शकतील. दुसऱ्या टेस्टपासून प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळू शकतो. केंद्र सरकारने कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स दिल्या आहेत. त्यानुसार खेळाच्या ठिकाणी 50 टक्के दर्शकांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
बीसीसीआय (BCCI) आणि तामीळनाडू क्रिकेट संघाने याआधीही प्रेक्षकांना मैदानात येऊन देण्याची मागणी केली होती. पण नंतर प्रेक्षकांशिवायच पहिले दोन सामने होतील, असं सांगण्यात आला. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या नव्या गाईडलाईन्समुळे दुसऱ्या टेस्टपासून स्टेडियममध्ये प्रेक्षण दिसू शकतात.
तामीळनाडू क्रिकेटचा एक वरिष्ठ अधिकारी पीटीआयशी बोलताना म्हणाला, ‘5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टेस्टसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी वेळेअभावी आता मिळणार नाही, कारण शनिवारी आम्हाला सरकारची अधिसूचना मिळाली. एवढ्या कमी वेळेत तुम्ही प्रेक्षकांना प्रवेश देऊ शकत नाही. पण 14 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये याचा विचार होऊ शकतो.’
चेन्नईच्या स्टेडियममध्ये एकावेळी 50 हजार प्रेक्षक बसू शकतात. जर बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यात सहमती झाली, तर 25 हजार प्रेक्षकांना बसण्याची परवानगी मिळू शकते. याबाबत आज बीसीसीआय आणि तामीळनाडू क्रिकेट संघाची महत्त्वाची बैठक होणार आहे.
अहमदाबादमध्ये प्रवेश निश्चित
चेन्नईबाबत निर्णय झालेला नसला, तरी अहमदाबादमध्ये मात्र प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल, हे निश्चित मानलं जात आहे. नव्याने बांधलेल्या मोटेरा स्टेडियममध्ये एकाच वेळी 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसू शकतात. हे जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे. आता कोरोनामुळे किती प्रेक्षकांना प्रवेश मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.