महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१। मुंबई । कोरोना काळात (Coronavirus) विविध कंपन्यांची कार्यपद्धती बदलली. वर्क फ्रॉम होम (Work From Home) ची पद्धती अनेक कंपन्यांनी स्विकारली. अद्यापही अनेक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशावेळी काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधा कायमची करण्याचा विचार केला आहे. याच दिशेने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणारी बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) देखील विचार करत आहे. बिझनेस टुडेमध्ये देण्यात आलेल्या वृत्तानुसार, बँक ऑफ बडोदा देशातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणार आहे जी कर्मचाऱ्यांना कायमचे घरातून काम देण्याचा विचार करत आहे.
BOB मध्ये अलीकडेच विजया बँक आणि देना बँकेचे विलिनीकरण झाले आहे. बँकेने कोरोना काळानंतर अशाप्रकारे रणनीती लागू करण्याच्या प्रस्तावासाठी मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म McKinsey & Co ची देखील नियुक्ती केली आहे. बँक ऑफ बडोदाचे सीईओ संजीव चड्ढा यांनी अशी माहिती दिली आहे की, बँक अशाप्रकारच्या पद्धतीवर विचार करत आहे. महामारीनंतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बँक काम करणार आहे.
चड्ढा यांनी तिसऱ्या तिमाहीमधील आर्थिक परिणामांची घोषणा करताना बँकेच्या या रणनीतीबाबत माहिती दिली. बँकेने तिसऱ्या तिमाहीतील त्यांता एकंदरित अहवाल बुधवारी सादर केला. आर्थिक वर्ष 2021 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बँक ऑफ बडोदा ला 1,061.1 कोटीचा फायदा झाला आहे, तर आर्थिक वर्ष 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये बँकेला 1,407 कोटीचे नुकसान झाले होते. तिसऱ्या तिमाहीमध्ये बँकेला व्याजातून मिळणारे उत्पन्न 8.6 टक्क्याने वाढून 7,749 कोटी झाले आहे, जे गेल्या वर्षीच्या तिमाहीमध्ये 7,132 कोटी होते.