अर्थसंकल्पः ‘इन्कम टॅक्स स्लॅब’ जैसे थे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ – नवी दिल्ली – संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. ‘इन्कम टॅक्स स्लॅब’मध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात काही बदल केला जातो का? याकडे नोकरदार वर्गाचे लक्ष लागून राहिले होते. पण नोकरदार वर्गाची सरकारने घोर निराशा केली आहे. कोणताही बदल इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सरकारकडून करण्यात आलेला नसल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षातही करदात्यांना आयकर भरावा लागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ या वर्षात देशात एकूण ६.४ कोटी नागरिकांनी आयकर भरल्याची माहिती दिली. टॅक्स ऑडिटची मर्यादा ५ कोटींवरुन वाढवून १० कोटी एवढी करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. याशिवाय, ७५ वर्षांवरील नागरिकांना ‘इन्कम टॅक्स’मधून आता सूट देण्यात आली आहे. ही सूट केवळ ७५ वर्षे झालेल्या पेन्शनधारकांसाठीच असणार आहे.

कोणताही बदल ‘इन्कम टॅक्स स्लॅब’मध्ये न केल्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणेच कररचना राहणार आहे. यात २.५ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपर्यंत आहे, त्यांना आयकर भरावा लागणार नाही. तर २.५ लाख ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के आयकर भरावा लागणार आहे. पुढे ५ ते ७.५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, ७.५ ते १० लाखांच्या उत्पन्नावर १५ टक्के, १० ते १२.५ लाखांच्या उत्पन्नावर २० टक्के, १२.५ ते १५ लाखांच्या उत्पन्नावर २५ टक्के आणि १५ लाखांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर ३० टक्के आयकर भरावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *