महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ – सॅन फ्रान्सिस्को – भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक भव्या लाल यांना नासाचा ऍक्टिंग चीफ ऑफ स्टाफ म्हणजेच कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन अंतराळ संस्थेत काही बदल घडवून आणण्यासह समीक्षा करू इच्छितात. याचमुळे त्यांनी भव्या यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भव्या या अंतराळ संशोधिका असून त्या बायडेन यांच्या हस्तांतरण पथकात सामील राहिल्या होत्या.
भव्या सर्वार्थाने या पदासाठी पात्र आहेत. अभियांत्रिकी तसेच अंतराळ तंत्रज्ञानाचा त्यांना अनुभव आहे. 2005-2020 पर्यंत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसी इन्स्टिटय़ूटच्या (एसटीपीआय) डिफेन्स ऍनालिलिस विंगमध्ये सदस्य म्हणून, संशोधिका म्हणून त्यांनी काम पाहिले असल्याचे नासाकडून म्हटले गेले आहे.
अंतराळ संशोधन, अंतराळ व्यूहनीति आणि धोरणात विशेष अनुभव असण्यासह त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये धोरण तसेच राष्ट्रीय अंतराळ परिषदेतही काम केले आहे. लाल यांना संरक्षण विभागासह स्पेस इंटेलिजेन्स कम्युनिटीचीही चांगली जाण असल्याचे उद्गार नासाकडून काढले गेले आहेत.
नासाच्या सल्लागार
भव्या यांनी सलग दोनवेळा नॅशनल ओशियानिक ऍडमिनिस्ट्रेशन कमिटीचे नेतृत्व केले आहे. नासामध्ये त्यांनी यापूर्वी सल्लागार परिषदेचे सदस्यपदही भूषविले आहे. अंतराळ संशोधनाप्रकरणी अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी सी-एसटीपीएस एलएलसीमध्येही कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच या कंपनीच्या त्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. अमेरिकन न्युक्लियर सोसायटी आणि इमर्जिंग टेक्नॉलॉजीशी संबंधित दोन सरकारी कंपन्यांनी भव्या यांना सल्लागार मंडळात स्थान दिले होते. अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांच्या सुचनेनुसार फेरबदल करण्यात आले होते. भव्या यांनी मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.