महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ – मुंबई – ‘बाल हक्क’ हा विषय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत ‘बाल न्याय’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, बाल कल्याण समितीचे काम लोकाभिमुख करणे तसेच बालगृहातील मुलांना आश्वासक भविष्य देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्द असल्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. महिला व बालकल्याण क्षेत्रातील तज्ज्ञ, समाजसेवी संस्थांचे योगदान मोलाचे असल्याचेही ॲड.ठाकूर म्हणाल्या.
महिला व बालकांच्या विकासाचे प्रश्न, धोरण, कायदे, कल्याणकारी उपक्रम व सध्या सुरु असलेल्या योजनांचा सखोल अभ्यास करुन त्यांची अंमलबजावणीच्या अनुषंगाने सूचना करण्यासाठी विविध क्षेत्रात तज्ज्ञ असलेल्या शासकीय/अशासकीय सदस्यांची मार्गदर्शक समिती महिला व बाल विकास विभागाने स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक मंत्री ॲड. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महिला व बालविकास आयुक्त ऋषिकेश यशोद, समितीचे सदस्य ॲड.निर्मला सामंत प्रभावळकर, ॲड. विजया बांगडे, येसूदास नायडू, आँड्रे डिमेलो, तारिक मोहम्मद, श्रद्धा बेलसरे, विजय राघवन, रवी आंबेकर, अल्पा वोरा, अनिरुद्ध पाटील, ज्योती नाले, परिषा सरनाईक उपस्थित होते.
.