महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.४। सातारा ।भारतीय सैन्य दलाला मोठा इतिहास आहे. सैन्यदलात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगुन बरेच विद्यार्थी जोमाने तयारीला लागतात. विशेष म्हणजे यासाठी कित्येक पालक हे आपल्या विद्यार्थ्यांना सैनिक स्कुलमध्ये प्रवेश मिळावा याकरिता प्रयत्न करीत असतात. या सैनिक शाळा म्हणजे एनडीए किंवा एनएला उत्तोमत्तत प्रशिक्षणार्थी पुरविणारी एक खाणच आहे. पण आजवर केवळ मुलांनाच सैनिक स्कुलमध्ये प्रवेश होता. पण आता संरक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सन् 2020-21 या शैक्षणिक वर्षापासुन मुलींनाही ही या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
मागील काही वर्षात लष्करी दलांमध्ये महिला अधिकाऱयांचा टक्का वाढावा यासाठी केंद्र सरकारकडून धोरणात्मक तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सातारा सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश देण्याची सुरूवात झाली आहे. यंदा मुलींसाठी 10 टक्के इतकी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाचे सध्या सर्व स्तरातुन स्वागत होत आहे. लष्करी दलातील प्रमुखांसह सर्वोत्तम उच्चाधिकारी देणाऱया शासकीय सैनिक शाळांमध्ये प्रवेश देण्यास मागील वर्षीच सुरुवात झाली. पण त्यामध्ये पहिल्या टप्प्यात केवळ सातच शाळांचा समावेश होता. आगामी शैक्षणिक सत्रापासून देशातील सर्वच म्हणजे एकुण 33 शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. याचा ‘आम्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’ अर्थात एएफएमसी सारख्या अकादमी निवडीसाठी या मुलींना चांगला फायदा होणार आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) किंवा नेव्हल अकादमीला (एनए) अधिकाधिक चांगले व दमदार प्रशिक्षणार्थी मिळावे आणि पुढे हे प्रशिक्षणार्थी लष्करातील सर्वोत्तम अधिकारी बनावे, या संकल्पनेतुन 1961 साली मुलांसाठी सैनिकी शाळांची स्थापना करण्यात आली. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी एक, यानुसार देशात एकुण 33 शाळा उभारण्यात आल्या.
देशात प्रथम सातारामध्ये ही सैनिक शाळा उभारण्यात आली. आत्ता महाराष्ट्रात दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरला एक शाळा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोमवारी झालेल्या अर्थसंकल्पात आणखीन 100 शाळा सामाजिक संस्थांमार्फत उभ्या करून त्या देखील याच सोसायटीशी संलग्न होणार आहे.
शाळेचे वैशिष्ठे
या सैनिक शाळांमध्ये इयत्ता 12 वी वर्गापर्यंतचे शिक्षण दिले जाते. त्याचवेळी लष्करात अधिकारीपदी प्रवेशासाठी इयत्ता 12 नंतर एनडीए/नेव्हल अकादमी तसेच अन्य काही थेट मुलाखतीवर आधारित संधी असतात. या सर्व संधी आजवर केवळ मुलांनाच होत्या. पण आता मुलींनाही यामध्ये प्रवेश घेता येणार आहे. सैनिक शाळेतील विद्यार्थी प्रतिवर्षी चांगल्या संख्येने एनडीए किंवा नेव्हल अकादमीत निवड होतात. याखेरीज लष्करी डॉक्टरांना तयार करण्यासाठी एएफएमसीची परीक्षा असते. त्यामुळे आता मुलींना सैनिक शाळेत प्रवेश खुला झाल्याने तेथे शिकणाऱया मुली स्वतःला ‘एएफएमसी’ साठी तयार करू शकतात.