कोरोना लशीचा दुसरा डोस कधी दिला जाणार ? केंद्र सरकारनं जारी केली तारीख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ५ – भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना (Healthcare Workers) कोरोना लशीचा (Corona Vaccine) पहिला डोस देण्यात आला आता त्यांना दुसरा डोस दिला देणार आहे. 13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल (Dr. V. K. Paul) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोरोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहिमेच्या (Vaccination Drive) पहिल्या टप्प्याची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांना आतापर्यंत केवळ पहिलाच डोस देण्यात आला आहे, अशी माहितीही डॉ. पॉल यांनी दिली.

द इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेतर्फे सांगण्यात आलं की, तिसऱ्या देशव्यापी सेरो सर्वेक्षणानुसार देशाच्या बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला अद्याप कोविड-19 चा धोका आहे. 17 डिसेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आलेल्या लोकसंख्येपैकी 21.5 टक्के लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला होता, असं आढळलं. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, 19 दिवसांत सुमारे 45 लाख जणांना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आला आहे. ‘अनेक देशांनी लसीकरण मोहीम सुरू करून 65 दिवस होऊन गेले आहेत. भारतात 16 जानेवारीपासून देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलं. दररोज लसीकरण होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे, असंही मंत्रालयाने सांगितलं.

24 तासांच्या कालावधीत आठ हजार सत्रांमध्ये तीन लाख 10 हजार 604 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत लसीकरणाची 84 हजार 617 सत्रं पार पडली आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.कोरोना लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोना योद्ध्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. त्यात कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्यक्ष युद्धपातळीवर लढणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर पुढील टप्प्यांत ज्येष्ठ नागरिक, तसंच सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *