महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.६। मुंबई। अकरावीत ऑनलाइन प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने प्रवेशाची शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2’ ला सुरुवात झाली असून ‘ऑनलाइन प्रवेश’ कॉलेजमध्ये जाऊन ‘निश्चित’ करण्यासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षातील अकरावीची प्रक्रिया समाप्त होईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती महापालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आतापर्यंत तीन नियमित फेऱया, 2 विशेष फेऱया आणि प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेऱयांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवेश फेऱयांनंतरही काही विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले असून अशा विद्यार्थ्यांना ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरी 2’ मधून प्रवेशाची शेवटची संधी दिली असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशासाठी 13 फेब्रुवारी ही अंतिम तारीख असून त्यानंतर या वर्षातील अकरावी प्रवेश बंद होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 13 फेब्रुवारीपूर्वी आपले प्रवेश निश्चित करावे, अशा सूचना जगताप यांनी दिल्या आहेत.