उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला, निफाड शहरात पारा 7 अंशांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.८ । नाशिक । उत्तर भारतात येत असलेल्या पश्चिम चक्रवातामुळे बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी नाशिक जिल्ह्यातील निफाड गहू संशोधन केंद्रात किमान तापमान ७.३, तर नाशिक शहरात १० अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यातही पारा उतरत असून औरंगाबादमध्ये १३ अंश अशा किमान तापमानाची नोंद झाली. नागपूरमध्ये किमान तापमान १२ अंशांवर आले असून येत्या काही दिवसांत या तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

उत्तर भारतातील सहा राज्यांत पुढील ४ दिवस पश्चिमी प्रकोपामुळे पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट, शीतलहर व त्यानंतर धुके इत्यादी वातावरणाच्या घडामोडी घडून येण्याचा अंदाज असून त्याचा विशेष परिणाम महाराष्ट्रात जाणवणार नाही. अति पश्चिमी प्रकोपाची साखळी अजूनही उत्तर भारतात सुरूच आहे. आगामी पुढील ३ दिवस महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात २-४ डिग्रीने घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज असून त्यानंतर थंडीत विशेष बदल जाणवणार नसल्याचा अंदाज हवामान खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात पाऊस किंवा गारपीट नाही
गारपिटीचा काळ असूनही महाराष्ट्रात कुठेही गारपिटीचा मागमूस नाही ही एक जमेची बाजू असल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केलेे. यंदाच्या हंगामात पश्चिमी चक्रवाताची संख्या ही सुमारे २५ पेक्षा अधिक झाली आहे. त्याचा परिणाम हा थंडीच्या चढउतारामध्ये दिसून येत असल्याचे खुळे यांनी सांगितले. नाशिक शहरात अचानक दोन दिवसांपासून वाढलेल्या थंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शाळा नसल्याने विद्यार्थी रस्त्यावर दिसून येत नसले तरी शहरात सकाळी आणि रात्री लवकर शुकशुकाट दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *