महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.८ । मुंबई । प्रस्तावित सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सुधारणा कायदा रद्द करावा, अशी मागणी मुंबई बिडी तंबाखू व्यापारी संघाने केली आहे. या कायद्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल आठ लाख व देशातील चार कोटी किरकोळ विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यापारी संघाने व्यक्त केली आहे. व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन आरोग्य मंत्रालयाकडे सदर कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
कायद्याचे उल्लंघन झाल्यास 50 हजार ते 1 लाख रुपयांचा दंड, सात वर्षांची शिक्षा, मालाची जप्ती, अशा तरतुदी या कायद्यात आहेत. व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आरोग्य मंत्रालयाकडे हा कायदा रद्द करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही केली. या वेळी फेडरेशन ऑफ रिटेलली असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य व मुंबई बिडी, तंबाखू व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष नंदपुमार हेगिष्टे, सचिव सुभाष साबळे, एफआरएआयचे सचिव विनय चौरसिया, मध्य प्रदेशचे कार्याध्यक्ष रत्नेश उपाध्यक्ष, बिहारचे मुकेश पुमार आदी उपस्थित होते.