BCCI वापरणार ड्रोन; केंद्र सरकारने दिली परवानगी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ९ – केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय (BCCI)ला इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2021) स्पर्धेसह अन्य क्रिकेट सत्रात ड्रोन वापरण्याची परवानगी दिली आहे. बीसीसीआय एरियल सिनेमॅटोग्राफीसाठी ड्रोनचा वापर करणार आहे. केंद्र सरकारने यासाठी बीसीसीआयला सतर्श परवानगी दिली. बीसीसीआय आणि मेसर्स क्विडिकडून हवाई छायाचित्रणासाठी रिमोट पायलट एअरक्राफ्ट सिस्टीम (आरपीएएस) वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाला विनंती देण्यात आली होती.

या वर्षी एप्रिलपासून सुरू होणारा आयपीएलचा १४वा हंगाम ड्रोनद्वारे आयोजित केली जाणारी पहिली स्पर्धा असेल. नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव अंबर दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार ड्रोन इकोसिस्टम देशात वेगाने विकसीत होत आहे. याचा वापर कृषी, आरोग्य आणि नैसर्गिक संकटाच्या काळात तसेच क्रीडा क्षेत्रात केला जात आहे.

कायदा मंत्रालया सोबत ड्रोन नियम २०२१ संदर्भात चर्चा सुरू असल्याचे दुबे यांनी सांगितले. मार्च २०२१ पर्यंत त्याला मंजूरी मिळेल असे वाटते. विविध कारणांमुळे मुंबई पोलिस ड्रोनच्या वापरावरून खुप अलर्ट आहे. मुंबईत देशातील सर्वात गर्दीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, सुरक्षेसंदर्भातील अन्य महत्त्वाची ठिकाणी आहेत.

बीसीसीआयला देण्यात आलेली परवानगी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आहे. या काळात ड्रोनचा वापर सर्व अटी आणि नियमांचे पालन करून करावा लागणार आहे. जर यापैकी एखाद्या नियमांचे उल्लंघन केले तर ही परवानगी रद्द केली जाऊ शकते.

ड्रोनचा वापर करण्याआधी बीसीसीआयला स्थानिक प्रशासन, संरक्षण आणि भारतीय हवाई दल तसेच स्थानिक हवाई नियंत्रण कक्षाकडून मंजूरी घ्यावी लागणार आहे. ड्रोनद्वारे केल्या जाणाऱ्या फोटो आणि व्हिडिओचा वापर फक्त आणि फक्त बीसीसीआयद्वारेच केला जाईल असे देखील म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *