महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० । मुंबई । वाहतूक पोलिसांनी टोईंग केलेल्या वाहनांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. टोईंग केलेल्या वाहनांची माहितीचे नोटिफिकेशन वाहतूक पोलिसांच्या एमटीपी ऍप्सवर येणार आहे. कोणत्या अधिकाऱ्य़ाने वाहन टोईंग केले असून ते कोणत्या वाहतूक चौकीला जाऊन टोईंगचा दंड भरायचा आहे, याची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.
मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. काही चालक हे रस्त्यावर जेथे जागा मिळेल किंवा नो पार्ंकगमध्ये वाहने उभी करतात. वाहतुकीला अडथळा ठरणारी ती वाहने वाहतूक पोलीस टोईंग करतात.टोईंग केलेली वाहने कुठल्या चौकीला नेली यासाठी तेथे खडूने लिहिले जाते. पण वाहनाच्या वर्दळीमुळे ते पुसले जाते. त्यामुळे आपले वाहन चोरीला तर नाही गेले, अशी चालकांना भीती असते. अखेर विचारपूस केल्यावर ते वाहन टोविंग केल्याचे समजल्यावर चालक वाहतूक चौकीशी संपर्क साधतात. याची दखल अखेर वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.
वाहतूक पोलिसांनी तयार केलेल्या एमटीपी ऍप्सवर ज्या चालकाचे वाहनाचे आणि मोबाईल नंबर नोंद असतील अशांना त्याचे वाहन टोविंगबाबत नोटिफिकेशन येणार आहे. ते वाहन कोणत्या वाहतूक चौकीच्या अधिकाऱ्य़ाने टोविंग करून नेले, त्याचा नंबर आणि टोविंग केलेल्या वाहनाचा फोटो दिसणार आहे.सन 1873 साली बॉम्बे ट्रामवे कंपनीने मुंबईत घोडय़ाच्या सहाय्याने ओढली जाणारी ट्राम सेवा सुरू केली. तेव्हापासून शहरात वाहतूक नियंत्रणाला सुरुवात झाली. सन 1924 मध्ये मुंबईत पहिले वाहतूक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले होते. काळानुसार बदल होत गेल्यानंतर मुंबई वाहतूक पोलीस देखील हायटेक होत गेले.चार वर्षांपूर्वी मुंबई वाहतूक पोलिसांनी एमटीपी ऍप्स सुरू केले असून आतापर्यंत 16 लाख लोकांनी हे ऍप्स डाऊनलोड केले आहे.