कोरोना लसीकरण संपताच देशात लागू होणार CAA ; अमित शहांची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ । कलकत्ता । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना लसीकरण मोहिम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. निर्वासितांना नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत नागरिकत्व दिले जाणार आहे. अमित शहा यांनी ही घोषणा पश्चिम बंगालमधील रॅलीमध्ये बोलत असताना केली. त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर यावेळी टीका करत आता त्यांची वेळ संपल्याचे म्हटले.

आता दीदींची वेळ संपली आहे. ममतादीदी बंगाल निवडणूक संपेपर्यंत जय श्रीराम म्हणतील हे माझे आश्वासन आहे. पुढील सरकार भाजपच्या नेतृत्वात स्थापन होईल. शंतनू ठाकूर यांना मी आश्वासन दिले आहे की, सीएएसंबंधी सर्व शंका मी येथे येऊन दूर करणार असल्याचे अमित शहा यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आयुषमान योजना लागू केली जाणार असल्याचे अमित शहा यांनी आश्वासन देत शेतकऱ्यांना वार्षिक थकबाकी व्यतिरिक्त सहा हजारांची मदत केली जाईल, असे सांगितले. केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये सत्ता आल्यानंतर ‘शरणार्थी कल्याण योजना’ राबवणार असल्याचेही ते म्हणाले.

आम्ही २०१८ मध्ये सर्वांसाठी सीएए असे आश्वासन दिले होते. आम्हाला २०१९ मध्ये त्यांनी समर्थन दिले आणि २०२० मध्ये सीएए आले. आपण सीएएला परवानगी देणार नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते. जे आश्वासन आम्ही देतो ते पूर्ण करतो. कोरोना लसीकरण आणि महामारी संपताच आम्ही सीएए लागू करणार असल्याचे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *