महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ । मुंबई । राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी केली जाणार असून संपूर्ण राज्य कोरोना संकटानंतर पूर्वपदावर येत असले तरीही राज्य सरकारकडून अद्याप काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंबंधीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारची शिवजयंती संदर्भातील नियमावली
साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करा.
गड-किल्ल्यांवर जाऊन यंदा शिवजयंती साजरी करु नये.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सार्वजनिक ठिकाणी आयोजन करु नये.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांवर बंदी.
महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे.
शिवजयंती फक्त १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी.
आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी
एकीकडे लसीकरणाची तयारी सुरु असताना राज्यात बुधवारी २४ तासात ३४५१ नवे करोना रुग्ण सापडले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
गेल्या २४ तासात राज्यात ३४५१ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे तर २४२१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १९ लाख ६३ हजार ९४६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३५ हजार ६३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.७ टक्के झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.