पहिल्या दिवसअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत ; उद्या पंत कडून अपेक्षा

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ ।चेन्नई । भारतीय संघाने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. मागील काही सामन्यात सातत्याने टीकेचे धनी ठरणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकले. वरच्या फळीतील शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहितला साथ दिल्यामुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. इंग्लंडकड़ून लीच आणि मोईन अली या दोघांनी २-२ बळी टिपले.

नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शून्यावर शुबमन गिल बाद झाला. चेतेश्वर पुजाराच्या साथीने रोहित शर्माने डाव पुढे नेला. पण २१ धावांवर पुजारा माघारी परतला. पाठोपाठ विराट कोहलीदेखील शून्यावर त्रिफळाचीत झाल्यानंतर दोन मुंबईकरांनी भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी १५२ धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारी दरम्यान रोहितने चेन्नईच्या मैदानावर आपले पहिले शतक ठोकले.

२३१ चेंडूत १६१ धावा काढून रोहित बाद झाला. १८ चौकार आणि दोन षटकार त्याने लगावले. रोहित फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळून बाद झाला. रोहित माघारी परतल्यानंतर भारताने झटपट गडी गमावले. आधी अजिंक्य रहाणे अर्धशतकी खेळी करून त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चौकारांसह १४९ चेंडूत ६७ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनदेखील १३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंत (३३*) आणि अक्षर पटेल (५*) यांनी खेळपट्टीवर सांभाळली आणि संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *