महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ । कोल्हापूर । पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर कोल्हापुरात शंभर एकर जागेत आयटी पार्क उभारणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात केली. कागल तालुक्यातील अन्नपूर्णा साखर आणि गूळ प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी देसाई कोल्हापुरात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शाहू महाराजांनी कोल्हापूरला उद्योगनगरी म्हणून ओळख दिली. ही ओळख कायम ठेवतानाच उद्योगाचा हा वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे.
देसाई म्हणाले, हिंजवडीप्रमाणे कोल्हापुरात शंभर एकर जागेवर हे आयटी पार्क उभारण्यात येईल. यासाठी मुंबईसह राज्यभरातील अनेक उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल. त्यांना तत्काळ जमिन व सुविधा देण्यात येतील. कोल्हापुरातील स्थानिक उद्योजकांशी चर्चा करून जागा निश्चित करण्यात येईल. कोल्हापुरात जो माल तयार होतो, त्याचा दर्जा अतिशय चांगला असतो. त्यामुळे त्याला परदेशातूनही मागणी असते. याचाच फायदा येथील उद्योगांना होईल.
दरम्यान, या आयटी पार्कसाठी हातकणंगले तालुक्यातील संभापूर, कासारवाडी येथील जमीन मालक जागा देण्यास तयार आहेत. २५० एकर पेक्षा मोठे नियोजित शहर करण्याचा तेथे विचार असल्याने या कामी सरकारने सर्व सरकारी परवानग्या लवकरात लवकर द्याव्यात या मागणीचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना खासदार धैर्यशील माने यांनी दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देसाई यांनी दिले.