महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ । बेळगाव । पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडतायत. स्वस्तात मस्त अन् प्रदूषणमुक्त प्रवासासाठी सध्या बाजारात नवनवीन इलेक्ट्रिक बाइक्स आणि कार लाँच होतायत. अशातच बेळगावातील एका दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्याने चक्क भंगारापासून नवी कोरी इलेक्ट्रिक बाईक तयार केली आहे. त्याची ही बाईक एका चार्जिंगमध्ये 40 किमी अंतर कापते.
लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने मिळालेल्या मोकळ्या वेळेत प्रथमेश सुतार या विद्यार्थ्याने ही बाईक तयार केली आहे. या कामात त्याच्या वडिलांनीही त्याला मोलाची साथ दिली. प्रथमेशचे वडील इलेक्ट्रिशियन आहेत. त्यांच्याकडूनच त्याने भंगारातील सामान घेतले होते. फक्त अॅसिड बॅटरी त्याला विकत घ्यावी लागली. या बाईकचा टॉप स्पीड ताशी 40 किमी असून तिला रिव्हर्स गिअरसुद्धा आहेत.