महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ । मुंबई । ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना झाली आज त्याच शिवजयंतीच्या मिरवणुकीवर कोरोनाच्या नावाने निर्बंध आणले जात आहेत. बघताय ना बाळासाहेब, असे टोले लगावत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयावरील सरकारी निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासंदर्भात एक पत्रक सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी हे पत्रक प्रसारमाध्यमांकडे पाठवले आहे. शिवजयंती मिरवणुकीवर निर्बंध घातले असताना दुसरीकडे बाकी यच्चयावत सगळ्याच सार्वजनिक बाबींना मान्यता देण्यात आली आहे. तेव्हा कोरोना होत नाही का, असेही यात विचारण्यात आले आहे. बघताय ना बाळासाहेब अशी साद स्व. बाळासाहेब ठाकरेंना या पत्रकात घातली असताना बाळासाहेब स्वर्गातून हताशपणे पहात आहेत, असेही त्यात चितारण्यात आले आहे.
ज्या शिवछत्रपतींच्या नावे शिवसेनेची स्थापना झाली, आयुष्यभर शिवाजी महाराजांच्या नावे मते मागितली, शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि आता त्याच शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्तच्या रॅलीवर निर्बंध घातले आहेत. एकत्र जमून शिवजयंती उत्सव करण्यास परवानगी नाही, का तर म्हणजे कोरोना वाढेल, वा रे वा सरकार, अशा शब्दांत राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.
एरवी राजकीय नेत्यांचे वाढदिवस, मेळावे, आंदोलने, मोर्चे सगळे काही सुरु आहे. एवढंच काय डान्सबार, पब आणि आतातर नाईट लाईफही सुरु होत आहे. तेव्हा कोरोना होत नाही, पण शिवजयंतीला एकत्र जमलो तर कोरोना होणार, राज्य सरकारचा जाहीर निषेध, असा टोलाही सरकारला लगावण्यात आला आहे.