महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ । नवीदिल्ली । पुढील २ ते ३ आठवड्यांत ५० वर्षांवरील लोक व गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांना कोरोना लस दिली जाईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. देशात अशा लोकांची संख्या सुमारे २७ कोटी आहे. आरोग्यमंत्री म्हणाले, ‘देशात लसींची उपलब्धता, त्यातून किती देशाला कशा व केव्हा द्यायच्या, हे सर्व वरिष्ठ मंत्र्यांचा समूह ठरवतो. देशात कधी व कसे लसीकरण करायचे, याचा निर्णय नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिनेशन अॅडमिनिस्ट्रेशन फाॅर कोविड-१९ घेते. सध्या १८ ते १९ लसींच्या विविध टप्प्यांतील चाचण्या सुरू आहेत.’ छत्तीसगड सरकारकडून भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस परत करण्याबाबत हर्षवर्धन म्हणाले, ‘हे तेथील लाेकांचे दुर्दैव आहे.’ सूत्रांनुसार, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाल्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण सुरू केले. फ्रंटलाइन समूहातील लोकांची संख्या घटल्यानंतर दुसऱ्या समूहातील लोकांचे लसीकरण होईल. सरकारने १ कोटी आरोग्य कर्मचारी व २ कोटी फ्रंटलाइन कार्यकर्त्यांसह या वर्गाचाही प्राधान्यक्रमाच्या ३० कोटी लोकांत समावेश केला आहे. देशात सुमारे ८५ लाख आरोग्य व फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण झाले.
दुसऱ्या डोसबाबत : आयएमएचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले म्हणाले, लसींचा दुसरा डोस कधी मिळेल, याबाबत आयसीएमआर दिशानिर्देश ठरवत आहे. ते ३-४ दिवसांत स्पष्ट होईल. दुसरा डोस घेण्यासाठी अनेक लोक आले नाहीत. काहींच्या मते, दुसरा डोस ६ आठवड्यांनी दिला पाहिजे. याबाबत स्पष्टता येताच लसीकरण वेगाने वाढेल.
देशात १२ फेब्रुवारीला कोरोनाचे नवे रुग्ण १० हजारांपेक्षा कमी झाले होते. पण त्यानंतर हा आकडा पुन्हा १० हजारांवर गेला. सोमवारी ११,६४९ रुग्ण आढळले. मृत्यू ९० झाले. म्हणजे आकडा १०० पेक्षा कमी आहे. आता एकूण संक्रमितांची संख्या एक कोटी ९ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. सक्रिय रुग्ण १,३९,६३७ आहेत. देशात ७४% नवे रुग्ण केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील आहेत. केरळमध्ये ४,६१२ नवे रुग्ण आहेत. अशा प्रकारे देशात सक्रिय रुग्णांची संख्या २०७३ पर्यंत वाढली आहे.