महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ । मुंबई ।राज्याला लाभलेला 720 कि.मी. लांबीचा निसर्गसुंदर समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या कडेकपारींचा फायदा घेत पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने अॅडव्हेंटर टुरिझम धोरण आखले आहे. यामध्ये श्रीवर्धनमधील समुद्रात स्पुबा डायव्हिंग सुरू करण्याबरोबरच रत्नागिरीच्या समुद्रात साहसी जलक्रीडा सुरू करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे.महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाच्या वतीने 20 वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन महोत्सव आयोजित केले आहेत. त्याशिवाय आता जमीन, आकाश आणि पाण्यातील धाडसी क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी अॅडव्हेंचर टुरिझम पॉलिसी येणार आहे. त्यामध्ये पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, पॅरामोटरिंगचाही समावेश आहे. या तीन धाडसी क्रीडा प्रकार परदेशात खूपच लोकप्रिय आहेत. राज्यात त्यासाठी खासगी विकासकांना आमंत्रित करण्याची योजना आहे.
पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यासाठी मोठा पुढाकार घेतला आहे. यामध्ये खासगी लोकांनी उतरण्यासाठी नवीन धोरण येणार आहे. आपल्याकडे किल्ल्यांवर ट्रेकिंग आहे. कोलाडला रिव्हर राफ्टिंग सुरू आहे. कोविडनंतर लोकांना दुर्गम भागात जायला आवडते, पण राहण्याच्या सुविधा नाहीत आणि खासगी विकासक दुर्गम भागात गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे कमी गुंतवणुकीची पॅरेव्हॅनची योजना आणली आहे. तीन-चारजणांची गाडीतच राहण्याची सोय असलेली पॅरेव्हॅन दुर्गम भागात नेऊन वास्तव्य करता येईल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत सिंधुदुर्गात स्पुबा डायव्हिंग व स्नॉर्पेलिंग सुरू आहे. आता रायगड व रत्नागिरी जिह्यात हे सुरू करण्याची योजना आहे. या भागात आता पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या भागातील समुद्रात स्पुबा डायव्हिंग व स्नार्पेलिंग सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. अलिबाग व मांडवा बीचपेक्षा श्रीवर्धनचा समुद्र स्वच्छ आहे. पाणीही कमी प्रदूषित आहे. कारण स्पुब डायव्हिंगला पाणी स्वच्छ असणे आवश्यक आहे. शेखाडीत स्पुबा डायव्हिंग सुरू करण्यासाठी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे आग्रही आहेत असे पर्यटन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. समुद्री क्रीडा प्रकारांना चालना देण्यासाठी बोट राइड, बनाना राइड, पॅरासेलिंग, जेस स्किइंग असे प्रकार प्रकार महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत नागाव, काशिद व अन्य सात-आठ ठिकाणी सुरू आहेत. त्यात आता स्पुबा डायव्हिंगची योजना आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी अॅडव्हेंचर आणि पॅरेव्हॅन पॉलिसी आणली आहे. त्यातून पर्यटनाला चालना मिळेल आणि या क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासही मदत होईल. – डॉ. धनंजय सावळकर, सह संचालक, पर्यटन संचालनालय