महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०। मुंबई । कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरणनिर्मिती झाली असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर दिसू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत गगनाला भिडलेले सोन्याचे दर आता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागले आहेत. मुंबईत शुक्रवारी सोने 560 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर दर गेल्या आठ महिन्यांतील नीचांकावर कोसळले. मुंबईत एक तोळा अर्थात 10 ग्रॅम सोन्याचे दर शुक्रवारी 46 हजार 130 रुपयांवर पोहोचले.
गेल्या 10 दिवसांत दोन वेळा सोन्याच्या दरात नाममात्र 350 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. याउलट तब्बल सहा वेळा दर घटल्याने सोन्याची किंमत 2 हजार 110 रुपयांनी कमी झाली आहे. याशिवाय दोन दिवस सोने स्थिर होते. म्हणूनच या आठवड्यात सोन्याचे दर 46 हजार रुपयांखाली उतरण्याची शक्यता जाणकरांनी व्यक्त केली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यातही सोन्याच्या दरात सुमारे एक हजार रुपयांची घट नोंदवण्यात आली होती. 1 जानेवारी 2021 रोजी 49 हजार 940 रुपयांवर असलेले सोने 31 जानेवारीला 48 हजार 960 रुपयांपर्यंत घसरले होते. पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाल्याने 6 जानेवारीला सोने प्रतितोळा 51 हजार 350 रुपयांवर वधारले होते. मात्र त्यानंतर शेवटच्या आठवड्यात 48 हजार 800 रुपयांपर्यंत सोने उतरले.
अशी सुरू आहे सोने दरातील चढ-उतार
1 डिसेंबर 2020ला सोने दर प्रतितोळा 47 हजार 920 रुपयांवर होता.
31 डिसेंबरपर्यंत त्यात 2 हजार रुपयांची वाढ झाल्याने दर प्रतितोळा 49 हजार 930 रुपयांवर पोहचले.
1 नोव्हेंबर 2020ला 50 हजार 960 रुपयांवर असलेले सोने 30 नोव्हेंबरला 48 हजार 240 रुपयांपर्यंत घसरले.
नोव्हेंबर महिन्यातील 9 तारखेला सोन्याने 52 हजार 230 रुपयांचा पल्लाही गाठला होता.
ऑक्टोबर महिन्यातही प्रतितोळा 49 हजार 900 रुपयांवरील सोने 50 हजार 950 रुपयांपर्यंत वधारले होते.
सप्टेंबर महिन्यात 51 हजार 570 रुपये असलेले सोने 49 हजार 950 रुपयांपर्यंत घसरले होते.
ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 55 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचले होते.