महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२१। पुणे । पुण्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याच्या अफवा शनिवारी मोठ्या प्रमाणात पसरल्या असून त्यामध्ये कसलेही तथ्य नाही. शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज, रविवारी आढावा बैठक घेणार असून त्यामध्ये काही निर्बंध आणायचे का? आणायचे असतील तर ते कुठले, याबाबतचा निर्णय होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता सुरक्षित वावराच्या निकषांचे कसोशीने पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी केले आहे.यापूर्वी लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आलेल्या निर्णयांच्या ‘व्हिडिओ क्लिप’ समाजमाध्यमांवर शनिवारी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आणि त्यामुळे शहरात लॉकडाउन होत असल्याच्या अफवांचे पीक आहे. अनेक ठिकाणच्या कामागारांची लॉकडाउनच्या अफवेमुळे धांदल उडाली. तर, नागरिकांमध्येही काही प्रमाणात भीती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी लॉकडाउनचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले; तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
शहरात गेल्या आठवडाभरापासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होते आहे. ही वाढ शनिवारी काही प्रमाणात कमी नोंदवली गेली असली, तरी धोका टळलेला नाही. ‘अनलॉक’चा निर्णय घेतल्यानंतर रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली असून नागरिकांनी सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत नसल्याने करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली असून विनामास्क फिरणाऱ्या; तसेच हॉटेल, दुकाने, मॉल या ठिकाणी सुरक्षित वावराचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
पुण्यासह राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. राज्यात शनिवारी ६ हजार २८१ रुग्णांचे नव्याने निदान झाले आहे; तसेच ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून २.४७ टक्के एवढा मृत्यूदर आहे. आतापर्यंत एक कोटी ५६ लाख ५२ हजार ७४२ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी २० लाख ९३ हजार ९१३ एवढे राज्यात बाधित असून राज्यातील पॉझिटिव्हिटी दर हा १३.३८ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९२ हजार ५३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१६ टक्के आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
जिल्हा. सक्रिय रुग्ण
पुणे ९२१७
नागपूर ६३८८
औरंगाबाद ११४५
सातारा ९२७