महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। न्यूयॉर्क । कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेसमोर आता नवे संकट उभे ठाकले आहे. रक्त गोठवणार्या थंडीने देशाच्या विविध प्रांतांतील जनजीवन ठप्प झाले असून यात टेक्सासमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे टेक्सासमध्ये वीज आणि पाणीटंचाई निर्माण झाली असून सरकारतर्फे नागरिकांना अन्नाच्या पाकिटांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांच्या अनेक ठिकाणी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. बर्फवृष्टीमुळे गेल्या पाच दिवसांपासून वीज आणि गॅस पुरवठा खंडित आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे पाईप फुटल्याने राज्यातील 2.9 कोटी नागरिकांना पाण्यासाठीही झुंजावे लागत असून ह्युस्टनमध्ये एका मैदानासमोर पाण्याच्या बाटलीसाठी शेकडो नागरिकांची गर्दी होत आहे.
पारा कमालीचा खाली घसरल्याने या थंडीत तापमान नियंत्रित करणारे हिटरही निष्प्रभ ठरले आहेत. कार्बन मोनाक्सॉइडचे प्रमाण वाढल्याने अनेकांचा वाहनांतच मृत्यू झाला. तर काही जण हायपोथर्मियाची शिकार बनले.