नांदेडात पेट्रोल प्रतिलिटरला 99.98 रुपयांचा दर, परभणीत ‘पॉवर’ पेट्रोल 101 पार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२२। नांदेड ।पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढत होत असून पेट्रोलचे प्रतिलिटर दर आता शंभरीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचले आहेत. रविवारी नांदेड जिल्ह्यातील बिलोलीत पेट्रोलचे प्रतिलिटर दर ९९ रुपये ९८ पैसे, तर धर्माबादमध्ये हेच दर ९९ रुपये १४ पैशावर पोहोचले. त्याखालोखाल परभणीत पेट्रोलचा दर ९९ रुपये १२ पैशावर पोहोचला. पॉवर पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०१.८९ रुपयांवर पोहोचले आहेत. आैरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली येथेही दर जास्त असल्याने सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

रविवारी नांदेडमध्ये पेट्रोल ९८ रुपये ९९ पैसे, डिझेल ८८ रुपये ६६ पैसे प्रतिलिटर होते, तर धर्माबादमध्ये डिझेल ८८ रुपये ८१ पैसे, बिलोलीत डिझेल ८७ रुपये २६ पैसे प्रतिलिटर इतका दर गेला आहे. देगलूरमध्ये पेट्रोल ९८ रुपये, तर डिझेल ८६ रुपये प्रतिलिटर इतका दर आहे. जिल्ह्यातील सर्वात शेवटचा तालुका असलेल्या किनवटमध्ये पेट्रोल ९५ रुपये ६ पैसे, डिझेल ८८ रुपये ४८ पैसे इतका दर आहे. या ठिकाणी अकोला येथून पेट्रोल येते. तसेच खासगी कंपनीच्या पेट्रोल दराने मात्र शंभरी पार केली आहे. नांदेडसह अन्य तालुक्यांमध्ये सोलापूर, अकोला, नाशिक, मनमाड आदी ठिकाणांहून पेट्रोल येत असून लांबच्या अंतराची या दरामध्ये भर पडत आहे.

उस्मानाबाद : पेट्रोल ३७ पैशाने महागले
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. शनिवारी पेट्रोल ३७ आणि डिझेल ३८ पैसे प्रतिलिटरने महागले आहे. यामुळे रविवारी उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९७.३५ रुपये, तर डिझेल ८७.०८ रुपये प्रतिलिटर आहेत. जीवनावश्यक वस्तूंची सतत दरवाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी होत असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे कोरोनाच्या आर्थिक मंदीच्या झळा सोसाव्या लागत असताना जखमेवर मीठ चोळल्याप्रमाणे दरवाढ केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *