महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। मुंबई । पेट्रोल व डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असताना देशातील 5 राज्यांनी इंधनावरील कर कमी केले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालयमधील राज्य सरकारांचा त्यात समावेश आहे. नागालँड राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले असून 22 फेब्रुवारीपासून येथे नवे दर लागू झाले आहेत. महाराष्ट्रात असा काही निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मेघालय सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कपातीद्वारे दर नियंत्रणात देशभरात बाजी मारलेली आहे. मेघालयात हा कर 31.62 वरून थेट 20 टक्क्यांवर आणला आहे. परिणामी या राज्यात पेट्रोल 7.4 रुपयांनी, तर डिझेल 7.1 रुपयांनी स्वस्त झाले आहे. नागालँडमध्ये पेट्रोलवरील कर 29.80 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणला गेला आहे. प्रति लिटर पेट्रोलमागे 18.26 रुपयांऐवजी 16.04 रुपये कर आता लागेल. डिझेलवर 11.08 रुपयांऐवजी 10.51 रुपये कर आकारणी होईल. एकूणच पेट्रोल लिटरमागे 2.22 रुपयांनी, तर डिझेल 57 पैशांनी स्वस्त झाले आहे.
राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरहून अधिक झाले होते. नंतर राजस्थान सरकारनेही इंधनावरील कर 38 टक्क्यांवरून 36 टक्क्यांवर आणला. पश्चिम बंगाल सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात सरसकट एक रुपया कमी केला आहे. आसाम सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील प्रति लिटर कर पाच रुपयांनी कमी केला आहे.