दुबईमध्ये आता पब, पार्ट्या बंद ; कोरोना संसर्ग पुन्हा वाढला;

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। दुबई । जगातील सर्वात मोठे दोन इव्हेंट गल्फ फूड व डिफेन्स एक्स्पो दुबई व अबुधाबीत सुरू आहे आणि अब्जावधी डॉलर्सचे सौदेही सर्रास सुरू आहेत. परंतु कोरोना रुग्णांची संख्या वाढताच सरकार बॅकफूटवर गेले. ९७.७ लाख लोकसंख्येच्या यूएईमध्ये ५५.६ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. परंतु, दररोज सरासरी २८०० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या या लाटेत मृतांची संख्याही वाढत असल्याचे दिसते. १९ फेब्रुवारीला कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला. सरकार कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाटी तंत्रज्ञान व नियम आणखी कडक करत आहे. सरकारी कार्यालयांत व्हिडिआे कॉन्फरन्सिंग व रोबोटच्या मदतीने काम करत आहे.

दुबई इमिग्रेशनवर आयआरआयएस तंत्रज्ञान सुरू करण्यात आले आहे. त्यात प्रवाशांचा चेहरा हाच पासपोर्ट झाला आहे. दुबईला येणाऱ्या प्रवाशांना काही सूचना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार प्रवाशांना पीसीआर रिपोर्टवर क्यूआर कोड असणे अनिवार्य आहे. दुबईतील सर्व पब व बार बंद झाले आहेत. रेस्तराँ यापुढे कोणत्याही स्वरूपाचे मनोरंजनपर कार्यक्रम किंवा पार्ट्या आयोजित करू शकत नाहीत. कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास जानेवारीत १४ व्यावसायिक प्रतिष्ठानांना दुबई प्रशासनाने बंद केले होते. २१३ वर दंड लावला होता. एका आठवड्यात ३१ व्यावसायिक प्रतिष्ठानांना दंड लावला गेला. एका डेझर्ट टुरिस्ट कॅम्प, याॅट पार्टी व खासगी पार्टी असल्यास प्रत्येकी १० लाख रुपयांचा दंड लावला. व्हॉट्सअॅपवर कोरोना पीसीआर टेस्टची ऑफर देणाऱ्या एका ट्रॅव्हल एजन्सीला बंद करण्यात आले. सिनेमा हॉल व इनडोर इव्हेंटची क्षमता ५० टक्के करण्यात आली आहे. अबुधाबीत विवाहात कमाल १० व शोकसभेत २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला पीसीआर तपासणी अहवाल जमा करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. पार्टीवर पूर्णपणे बंदी आहे. सिनेमा हॉल देखील बंद आहे. डिसेंबरमध्ये दुबई शॉपिंग फेस्टिव्हल व न्यू इयरमध्ये लाखो प्रवासी आले होते. या दरम्यान कोरोना संसर्ग वाढण्यामागे हलगर्जीपणा देखील कारण ठरला आहे. दुबई मॉलमध्ये येणाऱ्या लोकांचे दररोजचे प्रमाण सरासरी २ लाख लोकांवर गेले होते. परंतु बाजारपेठेत गेल्या काही दिवसांत व्यवहार वाढला आहे. नियमांच्या पालनासाठी आवाहन, शिक्षा आणि दंडाच्या माध्यमातून सरकार लोकांना समजावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *