महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ – सतत उन्हाचे चटके सोसणारे मुंबईकर थंडीची आतुरतेनं वाट पाहात असतात. मात्र, यंदा मुंबईकरांची निराशा झाली आहे. फेब्रुवारी महिना हा खरं तर थंडीचा महिना म्हणून ओळखला जातो. मात्र, यंदा मुंबईकरांना ऐन फेब्रुवारीतही उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशात आज म्हणजेच बुधवारीदेखील मुंबईतील तापमानात (Mumbai Temperature) सामान्य तापमानापेक्षा 3 ते 4 अंश सेल्सियसनं वाढ झाली आहे. आज मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असणार असल्याचं हवामान शास्त्र विभागातील शास्त्रज्ञ के एस होसळीकर यांनी ट्वीट करत सांगितलं आहे.
आज सकाळीदेखील मुंबईतील तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे गुलाबी थंडीनं मुंबईला जवळपास रामराम ठोकला असल्याचंही होसळीकर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. रविवारीदेखील मुंबई उपनगरातील कमाल तापमान 36.3 अंश सेल्सियस तर मुंबई शहराचे तापमान 34.6 अंश सेल्सियसपर्यंत नोंदवण्यात आलं होतं. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार असं दिसतं, की गेल्या 22 वर्षांत मुंबईतील कमाल तपमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची ही तिसरी वेळ आहे.
गेल्या 22 वर्षांत 28 फेब्रुवारी 1999 रोजी आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान 38.5 अंश सेल्सियस नोंदवलं गेलं होतं, त्यानंतर 18 फेब्रुवारी 2017 रोजी 38.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं होतं. प्रादेशिक हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं की, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रवाह अधिक मजबूत झाला आहे. हे गरम वारे समुद्रातून मुंबईकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांना वाहू देत नाहीत. जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा मुंबईचे तापमान जास्त वाढते. त्यामुळे, सध्या तापमानात वाढ नोंदवली गेली आहे.