महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२६। पंढरपूर ।आ. भारत भालके यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, त्यांचे अचानक निधन झाल्यामुळे पंढरपूरची विधानसभा रिक्त झाली असून त्याठिकाणी पोटनिवडणुकाच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व असले तरी ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता नाही. कारण ही जागा भारतीय जनता पार्टी सहजासहजी सोडेल, असे वाटत नाही.सध्या भाजपकडून कोणी इच्छुक असल्याचे उघडपणे बोलत नसले तरी अनेकांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र, भालके यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे भालके कुटुंबातीलच कोणाला तरी संधी देतील, अशी चर्चा आहे. या निवडणुकीसाठी भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. संपूर्ण मतदारसंघात फिरून त्यांनी मतदारांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्याची तयारी, तर इच्छुकांनीही आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्याचे संपूर्ण अधिकार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आहेत. त्यामुळे त्यांच्या संपर्कात भगीरथ भालके, समाधान आवताडेंसह उमेश परिचारक आहेत. त्यामुळे पवारांच्या मनातील नेमका उमेदवार कोण, असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे.
मात्र राजकारणातील चाणाक्ष व्यक्तिमत्त्व असणार्या पवारांच्या मनात नेमके चाललय काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भगीरथ भालके यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद दिले आहे.त्यामुळे या निवडणुकीसाठी पवार कुटुंंब इतर कोणाचा विचार करणार का, असाही प्रश्न आता नव्याने उपस्थित केला जात आहे.
भारतीय जनता पार्टीनेही या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी यापूर्वी पंढरपूर विधानसभेची निवडणूक लढविली होती; मात्र त्यांना अपयश आले होते. शिवसेनेच्या वतीने ही समाधान आवताडे यांनी ही यापूर्वी ही विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यांनाही अपयश आले होते.दुसरीकडे अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही भाजपने आमदारकी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीची मदार आता मोहिते-पाटील कुटुंबासह आ. प्रशांत परिचारक यांच्यावर असणार आहे.त्यामुळे या निवडणुकीसाठीची जोरदार चर्चा आता पंढरपूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे.