महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – नवीदिल्ली – देशात पहिल्यांदाच खेळणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ‘भारत खेळणी मेळा’ या नावाने भरविण्यात आलेल्या सदर प्रदर्शनाला लाखो लोक भेट देतील, असा अंदाज आहे.
आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत ‘वोकल फॉर लोकल’ दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून खेळणी निर्मिती क्षेत्रात भारत वैश्विक हब बनावा, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय तसेच वस्त्रोद्योग मंत्रालयाने संयुक्तपणे इंडिया टॉय फेअरचे आयोजन केले आहे. फेअरसाठी दहा लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. देशाच्या खेळणी उद्योगात मोठी ताकत आहे. ही ताकत वाढविणे, त्याच्या ओळखीचा विस्तार करणे हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा मोठा भाग आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
पहिला खेळणी मेळावा हा केवळ आर्थिक किंवा व्यापारी हित लक्षात घेऊन आयोजित केलेला नाही तर देशाच्या पुरातन खेळ आणि उल्हासाच्या संस्कृतीला मजबूत करण्याचा धागा आहे. सिंधू खोऱ्यातील सभ्यता, मोहोन्जोदडो तसेच हडप्पा काळातील खेळण्यांवर अवघ्या जगाने संशोधन केलेले आहे. प्राचीन काळी जेव्हा जागतिक प्रवासी भारतात येत असत, तेव्हा ते भारतीय खेळ शिकत असत आणि हे खेळ ते आपल्या देशाकडे घेऊनही जात असत, असे मोदी म्हणाले. बुद्धिबळ, लुडो यासारखे खेळ पूर्वीच्या काळी भारतवर्षात चतुरंग आणि पच्चीसी या नावाने खेळले जात असत, असेही मोदी यांनी सांगितले.