महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – मुंबई – भारत आणि इंग्लंडदरम्यान (IND Vs ENG) सुरू असलेल्या क्रिकेट सीरिजमधले पुढचे सामने महाराष्ट्रात घ्यायचे की नाही यावरचं प्रश्नचिन्ह अखेर दूर झालं आहे. Coronavirus च्या वाढत्या साथीमुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा सुरू असतानाच क्रिकेट सामन्यांच्या भवितव्यावरही प्रश्न निर्माण झाला होता. पण आता पुण्यात (Pune) होणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय सामने होणार हे निश्चित झालं आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग काौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदीवसीय आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात खेळवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यांना परवानगी दिली असली, तरी मोठी अट घातली आहे.
पुण्यात होणारे हे तीनही क्रिकेट सामने विनाप्रेक्षक खेळवले जातील. कोरोनाचे सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सध्या पुण्यात आहेत. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांच्या सशर्त परवानगीनंतर तीन वन डे सामन्यांवरचं सावट दूर झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आता तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवू शकतो. त्यासाठी आता पुढील आवश्यक त्या सर्व परावानगीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन प्रयत्न करत आहे, असं सूत्रांनी सांगितलं.