महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ – पुणे – पुण्यातील जंगली महाराज रोडलगत असलेल्या वाहनांना भीषण आग लागली. दुपारच्या सुमारास लागलेल्या या आगीने नंतर रौद्र रूप धारण केलं. अखेर तीन फायर बंबच्या साहाय्याने ही आग विझवण्यात आली. वाहतूक विभागानं शहरातील गुन्ह्यात आणि ओढून आणलेल्या गाड्या महापालिकेच्या जागेत काही वर्षांपासून ठेवलेल्या आहेत. साधारण हजाराच्या आसपास दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या आहे. या वाहनांना दुपारी अचानक आग लागली आणि ही आग वाढतंच गेली. त्यामुळे या परिसरात काही काळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
जागा दाटीची असल्यानं इतरही वाहनांना ती आग लागली. या आगीत 10 ते 15 गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चारचाकी वाहनांसह जेसीबीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.दरम्यान, अग्निशमन विभागाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबतची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.