महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – भोपाळ – देशभरात इंधनाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कररचनेनुसार राज्या-राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वेगवेगळे आहेत. काही भागांमध्ये पेट्रोलच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आंदोलनही केलं आहे. तर काही ठिकाणी उपरोधिक आणि कल्पक पद्धतीने इंधन दरवाढीचा निषेध केला जात आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असाच काहीसा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो. केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या पेट्रोल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचा पर्याय काँग्रेस नेत्याने शोधून काढला. त्यासाठी भारतीयांचा श्वास असलेल्या क्रिकेटचं माध्यम निवडण्यात आलं. काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांनी भोपाळमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेच्या विजेत्यांना पैसे किंवा कार-बाईक नाही, तर याच कार-बाईकमध्ये टाकलं जाणारं पेट्रोल बक्षीस स्वरुपात देण्यात आलं. 28 फेब्रुवारीला झालेल्या या स्पर्धेचा फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
सनरायझर्स इलेव्हन (Sunrisers Eleven) आणि शागिर तारीक इलेव्हन (Shagir Tarik Eleven) या दोन संघांमध्ये क्रिकेट टूर्नामेंटचा अंतिम सामना खेळवला गेला. सनरायझर्स इलेव्हन संघाने बाजी मारत ट्रॉफीवर नाव कोरलं. सनरायझर्स इलेव्हन संघाचा क्रिकेटपटू सलाऊद्दिन अब्बासी (Salauddin Abbasi) याने असामान्य खेळी खेळली. त्यामुळे अब्बासीचा सामनावीर (player of the match) पुरस्काराने सन्मान करण्यात आला. (Madhya Pradesh Cricketer gets 5 liters Petrol after winning Man of the match award)
सामनावीर पुरस्काराने गौरव झाल्याने त्याला आयोजकांनी पाच लिटर पेट्रोल बक्षीस दिले. रोख इनाम देण्याऐवजी अब्बासीला ही अनोखी भेट देण्यात आली. हातात बॅट आणि पेट्रोलचा कॅन धरुन पंपासमोर उभ्या असलेल्या सलाऊद्दिन अब्बासीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.