शेगावचे गजानन महाराज यांचा आज प्रगट दिन ; ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा अर्थ काय? वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.५ मार्च – शेगावचे गजानन महाराज यांचा आज प्रगट दिन आहे. गजानन महाराजांचे चरित्र अनेक प्रकारच्या चमत्कारिक कथांनी भरलेले आहे. सामान्य दिसणारी व्यक्ती एक योगी पुरुष आहे, याची जाणीव लोकांना झाली, तेव्हा लोकांनी गजानन महाराजांचा ध्यास घेतला. आपली दुःखं, अडचणी सांगून त्यातून मार्ग दाखवा अशी या सिद्धपुरुषाला विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी समस्त भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे ‘गण गण गणात बोते!’

हा केवळ मंत्र नाही तर भगवंताच्या अस्तित्वाची पदोपदी होणारी जाणीव आहे. मंत्राचा अर्थ लक्षात घेतला, तर कळेल. गण म्हणजे जीव दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे रूप पाहता आले, तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतः देखील वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. हेच तत्त्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे,

ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः।
मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति।

या पृथ्वीवरील प्रत्येक जीव माझाच अंश आहे. या देहात स्थित असलेला जीवात्मा मन आणि पंचभूतांना आकर्षित करून घेतो.

म्हणून तर आपण म्हणतो, जिवा शिवाची भेट झाली. किंवा भेटीची आस लागली. ही आस म्हणजेच एका जीवाला दुसऱ्या जीवाप्रती असलेली ओढ. हे प्रेम उत्पन्न होणे, म्हणजेच गजानन महाराजांच्या मंत्रानुसार ‘गण गण गणात बोते’ अर्थात आत्मा आणि परमात्मा यांची भेट होणे.

ही जाणीव हृदयात नित्य होत राहावी आणि भगवंत भेटीची आस लागावी, म्हणून आपणही गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून एक मुखाने आणि एकदिलाने म्हणूया…’गण गण गणात बोते!’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *