महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नाशिक – दि. ५ मार्च -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी आलेले माजी महापौर अशोक मुर्तडक यांना पाहून राज यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी याबद्दल विचारताच मुर्तडक यांनी मास्क काढले. (MNS Chief Raj Thackeray in Nashik)करोनाची साथ आल्यानंतर जगभरातच लॉकडाऊनचा उपाय राबवण्यात आला होता. महाराष्ट्रातही लॉकडाऊन होता. मात्र, राज्य सरकारनं घातलेले अनेक कठोर निर्बंध मनसेला पटले नव्हते. त्यामुळं लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही महिन्यांनंतर मनसेनं लोकल ट्रेन, वाइन शॉप उघडण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. खुद्द राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अनेकदा पत्रे पाठवली होती.
मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी मनसेनं शाखा-शाखांवर ‘मराठीतून स्वाक्षरी’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,’ असं ते म्हणाले होते. सत्ताधारी नेत्यांनी त्यावरून त्यांच्यावर टीकाही केली होती. राज ठाकरेंना करोनाची भीती वाटत नसेल पण त्यांनी मास्क घातले नाही तर इतरांना करोना होऊ शकतो, असं टोला अजित पवार यांनी काल विधान परिषदेत बोलताना हाणला होता. त्यानंतरही राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे.