कोणत्याही सलामीवीराला जमला नाही अशा विक्रमाला रोहित शर्माची गवसणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – अहमदाबाद – दि. ५ मार्च – चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने सावध खेळ केला आहे. पहिल्या दिवशी शुबमन गिल पहिल्याच षटकात माघारी परतल्यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. पण, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या १६ धावांची भर घातल्यानंतर पुजारा (१७) बाद झाला. दरम्यान, रोहितने खिंड लढवताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा करणाऱ्या पहिल्या सलामीवीराचा मान रोहितने पटकावला. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अजिंक्य रहाणेने (१०६८) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १००० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय फलंदाजाचा मान पटकावला होता. मार्नस लाबुशेन (१६७५), जो रूट ( १६३०), स्टीव्ह स्मिथ (१३४१), बेन स्टोक्स (१३३२) हे फलंदाज आघाडीवर आहेत.

दरम्यान अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन जोडीच्या फिरकी जाळ्यात पाहुणा संघ पुन्हा अडकला. चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव पहिल्या दिवशी चहापानानंतर २०५ धावांत संपुष्टात आला. गेल्या कसोटीत ११ बळी घेणारा स्थानिक स्टार अक्षरने ६८ धावांच्या मोबदल्यात चार बळी घेतले, तर अश्विनने ४७ धावांत तीन बळी घेतले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दोन फलंदाजांना माघारी परतवले. बेन स्टोक्सचा (५५) अपवाद वगळता अन्य फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे सलामीवीर

रोहित शर्मा – १०००*
डेव्हिड वॉर्नर – ९४८
डिन एल्गर – ८४८
डॉम सिब्ली – ८४१
मयांक अग्रवाल – ८१०
सलामीवीर म्हणून सर्वात जलद १००० धावा करणारे फलंदाज

हर्बर्ट शटक्लिफ – १३ डाव
लेन हटन – १६ डाव
रोहित शर्मा – १७ डाव
ग्रॅमी स्मिथ – १७ डाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *