शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये झाली मोठी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – भांडवली बाजारातील घसरणीला आज सोमवारी ब्रेक लागला आहे. आज गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदीला प्राधान्य दिल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली. सध्या सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला आहे.जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांनी धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने गेल्या आठवड्यातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स ४४१ अंकांनी कोसळला तर निफ्टीत १४३ अंकांची घसरण झाली होती. या सत्रात गुंतवणूकदारांचे २.३० लाख कोटींचे नुकसान झाले होते.

आज मात्र बाजारात सकाळपासून खरेदीचा ओघ दिसून आला. बाजार उघडताच सेन्सेक्सने ३५० अंकांची झेप घेतली. तर निफ्टीने पुन्हा १५००० अंकांची पातळी गाठली. निफ्टी १०० अंकांची वाढ झाली होती. सध्या सेन्सेक्स १३० अंकांनी वधारला असून ५०५३५ अंकांवर आहे. तर निफ्टी ४२ अंकांनी वधारला असून १४९८० अंकांवर आहे.

आजच्या सत्रात बँका, वित्तसंस्था, ऑटो, ऊर्जा या क्षेत्रात खरेदीचा ओघ आहे. सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २२ शेअर तेजीत आहेत. त्यात ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बँक, एनटीपीसी, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, मारुती, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, इन्फोसिस, एचडीएफसी या शेअरच्या किमतीत वाढ झाली आहे.

दुसऱ्या बाजूला आयटीसी, टीसीएस, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, डॉ. रेड्डीज लॅब, एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, बजाज ऑटो या शेअरमध्ये घसरण झाली आहे. बीईएमएलच्या शेअरमध्ये ७ टक्के आणि ओएनजीसी ४ टक्के वाढ झाली आहे. निफ्टीवरील सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी बँक इंडेक्स ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आज साखर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. साखर उद्योगासाठी आगामी हंगाम चांगला असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आल्या नंतर बलरामपूर चिनी, ईआयडी पॅरी, द्वारिकेश शुगर, धामपूर शुगर, दालमिया भारत शुगर या शेअरमध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *