महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । नाशिक ।गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी संचारबंदी करण्यात आलीय. तसेच मुंबई आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध लादण्यात आलेत. नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हााधिकाऱ्यांनी दिलीय. (Partial lockdown in Nashik; All schools, colleges, coaching classes completely closed)
10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत. बार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभांवर पूर्णतः बंदी लादण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी असतील. शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळं बंद राहणार आहेत. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, कोरोना जनजागृती सप्ताहही राबवण्यात आलाय.
नाशिक जिल्ह्यातील गर्दीच्या स्थळांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे. केवळ कारवाईवर आधारित व्यवस्था राबवणं देखील शक्य नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई कठोर होणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह जर इतरत्र फिरताना दिसला, तर गंभीर कारवाई केली जाणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम आहे. येथे काल दिवसभरात 645 नवे रुग्ण आढळले होते तर आज या जिल्ह्यात नव्याने 675 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. येथे अवघ्या 2 दिवसांत 1320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.