महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । पिंपरी चिंचवड । महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली असतानाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पासांठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामुळे मागच्या सरकारच्या काळात ठप्प झालेली विकासाची प्रक्रिया सुरु होणार असून महाराष्ट्राची विकासपथावर वेगाने घोडदौड सुरु होईल. राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पाचे स्वागत करून बनसोडे म्हणाले की, पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक “राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क”, राज्यातील युवकांसाठी कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना सुरू करण्यता येणार असून, शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा 5 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून राज्याच्या प्रगतीचा वेगही वाढणार आहे.