महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । नैरोबी । सोने म्हटलं की अजूनही माणसाला लोभ सुटतो. नदीच्या पात्रापासून ते गटारीपर्यंत अनेक ठिकाणी लोक सोन्याचे कण वेचण्यासाठी प्रयत्न करीत असतात. अशी ‘गोल्ड रश’ जगात सर्वत्र सुरू असते. आता कांगोमध्ये ‘सोन्याचा डोंगर’ सापडला असून तेथील सोने लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. हा डोंगर म्हणजे सोन्याची खाणच असल्याचे म्हटले जात आहे.
या नव्याने शोधलेल्या सोन्याच्या खाणीची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी तिथे उत्खनन करून सोने मिळवण्यासाठी गर्दी केली. अखेर कांगोच्या प्रशासनाने तिथे उत्खनन करण्यास बंदी घातली. तेथील लोकांच्या गर्दीचा एक व्हिडीओही आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पत्रकार अहमद अलगोहबरी यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. कांगोच्या कीवू नावाच्या प्रांतात हा डोंगर आहे. या डोंगरातील 60 ते 90 टक्के भागात सोने सापडते असे सांगितले जात आहे. कांगो हा देश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. तिथे तेल, हिरे व अनेक खनिजांच्या खाणी आहेत. आता या सोन्याच्या डोंगरावर उत्खनन करण्यासाठी आधी नोंदणी करावी लागणार आहे.