महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१० मार्च । मुंबई । कोरोना काळातील वाढत्या कार्यभाराचा आणि सुविधांवरील मर्यादांचा फटका वैद्यकीय शिक्षण घेणार्या राज्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणार्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या निकालामध्ये सर्वच ठिकाणी टक्का मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यातही कोरोनाचा नवा भर पुन्हा चिंताजनक वळणावर गेला, तर नव्याने दाखल झालेल्या पहिल्या वर्षाच्या आणि प्रथम वर्षातून दुसर्या वर्षात गेलेल्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसू शकतो, अशी भीती वैद्यकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण देणार्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा निकाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने नुकताच जाहीर करण्यात आला. राज्यातील या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत गुणवत्तेवर आधारित प्रवेश दिला जातो. तेथे प्रवेश मिळविण्यासाठी गुणवान विद्यार्थ्यांतही मोठी स्पर्धा लागलेली असते. साहजिकच, गुणवान विद्यार्थी शिकत असल्यामुळे या महाविद्यालयांची निकालाची परंपरा नेहमीच अव्वल असते. निकाल किती लागला, यापेक्षा कोण अनुत्तीर्ण झाले एवढाच विषय असतो आणि अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही हाताच्या बोटावर मोजण्यापलीकडे जात नाही.
2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी हा निकाल आहे. मुळातच या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होताना न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रवेश उशिरा झाले होेते आणि त्यानंतर कोरोना संक्रमण काळ सुरू झाला. या कालावधीत विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे कठीण झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लासेसचा पर्याय निवडण्यात आला होता; पण प्रत्यक्षात ज्या गावी विद्यार्थी परतले, तेथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीने विद्यार्थ्यांना दगा दिला. बर्याच ठिकाणी कोरोना साथीचे स्वरूप गंभीर बनल्यामुळे उपलब्ध सर्व वैद्यकीय शिक्षक साथ निवारणाच्या कार्यामध्ये अहोरात्र अडकून पडले होते. यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रमही यथातथाच राबविला गेला. या सर्वाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर पडल्याची चर्चा आहे.
यंदा मात्र राज्यातील नामवंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे प्रमाण सरासरी 10 टक्क्यांनी घसरले. दीर्घकाळ वैद्यकीय शिक्षणाची परंपरा असलेल्या मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनुत्तीर्ण विद्याथ्यार्र्ंचे प्रमाण जवळजवळ 30 टक्क्यांवर गेले आहे. शिवाय, कोल्हापूरच्या शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाही 71 टक्के निकाल लागल्यामुळे वैद्यकीय शिक्षकांत या निकालाची कारणमीमांसा सुरू झाली आहे.